मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’अंतर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेचे एक लाख ६७ हजार ग्राहक असून त्यांची यादी पुरवठा विभागाने तयार केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाणार असून सध्या या लाभार्थींचे ई-केवायसीची प्रक्रिया सुरू आहे.
उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकार एका गॅस सिलिंडरमागे ३०० रुपये अनुदान देते, तर एका गॅस सिलिंडरची बाजारातील सरासरी किंमत ८३० रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर ५३० रुपये याप्रमाणे तीन गॅस सिलेंडरच्या मर्यादेत राज्य शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.
केंद्राची योजना राबविल्यास त्याचा राज्यातील महायुती सरकारला अपेक्षित लाभ मिळू शकणार नाही म्हणून राज्याची स्वतंत्र योजना म्हणून राबविण्यात येणार आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा मुख्यमंत्र्यांनी आग्रह केल्याचे बोलले जात आ
हे. मात्र, यामुळे सरकारच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढेल, अशी चिंता नियोजन आणि वित्त विभागाने व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे तुर्तास मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ उज्वला योजनेतील लाभार्थींनाच दिला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार लाभार्थी आहेत.