महामार्गावरील निकृष्ट रस्त्याच्या कामावरून शनिवारी हातकणंगले तालुक्यातील किणी टोलनाक्यावर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांनी आंदोलन केले. यातूनच पंधरा दिवसांत सेवा रस्ते दुरुस्त करणार, २५ टक्के टोलमाफी असलेल्या धोरणात अजून २५ टक्के वाढ करण्यासाठी पाठपुरावा आणि २० किलोमीटर परिघातील वाहनमालकांना टोलमाफी अशा आश्वासनाचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी दिले.
काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर किणी टोलनाका परिघाच्या २० किलोमीटर अंतरातील गावांत टोलमाफीचा पास मिळणार, हा मुद्दा ठळकपणे चर्चेत आला आहे. सुमारे ३८ गावांतील वाहनचालकांना याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी ओळख सांगून टोलमाफी मिळविणाऱ्या वाहनधारकांची संख्या अत्यल्प होती. आता संबंधित परिघातील वाहनमालकांना टोलमाफीचा अधिकार मिळणार आहे. या टोलमाफीची विचारपूस करण्यासाठी टोलनाक्यावर गर्दी होत आहे. त्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या आता हजारोंच्या घरात पोहोचेल.
टोलमाफीसाठी ३१५ रुपये भरुन महिन्याचा पास मिळणार आहे. यासाठी टोल नाक्याच्या कार्यालयात आधार कार्ड व वाहनासंदर्भात आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. पासमुळे मोठी आर्थिक बचत होणार आहे.