खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथील साठवण तलावाच्या बांधावरील वाढलेली झाडे झुडपे काढावीत, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रोहन जाधव यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याकडे केली आहे. सुलतानगादे येथे असणाऱ्या साठवण तलावाच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढल्यामुळे या बांधावरून ये-जा करणे त्रासदायक
होऊ लागले आहे.
या वाढलेल्या झाडीमुळे परिसरात सापांचे व लांडग्यांचे प्रमाण वाढल्याने लोकात भीतीचे वातावरण आहे. सकाळी तलाव परिसरात व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. या परिसरातील झाडे झुडपे काढून स्वच्छता करावी अशी मागणी रोहन जाधव यांनी केली आहे. यावेळी रणजीत जाधव, सुनील कापसे, प्रवीण सूर्यवंशी, विकास जाधव, पवन जाधव, संतोष चंदनशिवे, ऋषिकेश म्हेत्रे, भागवत माने, शुभम निकम, रामहरी जाधव, शंकर जाधव आदी उपस्थित होते.