स्मशानभूमीच्या कामासाठी दिघंचीमध्ये ‘रास्ता रोको’

दिघंची (ता. आटपाडी) येथील फुले-शाहू-आंबेडकर चौकात दिघंचीतील नागरिकांनी स्मशानभूमीच्या अपूर्ण कामासाठी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलक चौकातील रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले होते. रास्ता रोकोमुळे चौकातील चारही रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

स्मशानभूमीचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते व आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्या अनुषंगाने मंगळवारी दिघंची येथे रास्ता रोको केला. आटपाडी पोलिसांसह गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. मुक्तेश्वर माडगूळकर यांनी आंदोलकांशी संवाद साधत दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.