गणपती सजावटीसाठी बाजारपेठा सजल्या! चांदीच्या आभूषणांना वाढती मागणी……

सध्या गणपतीचे आगमन काही दिवसांवरच येऊन ठेपले आहे. गणपती आगमनासाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येकाची धावपळ सुरू झालेली आहे. तसेच गणपती मंडळांनी आपापली तयारी देखील जोरदार सुरू केलेली आहे. मंडप उभारणीपासून ते गणपतीच्या दागिन्यांपर्यंत सर्वांचीच तयारी सुरू झालेली आहे.

देवदेवतांच्या मूर्ती सुंदर दिसण्यासाठी गळ्यातील अँटिक व इतर दागिने घालण्याची प्रथा हळूहळू वाढत चालली आहे, गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी चांदीच्या आभूषणांना प्रचंड मागणी वाढली आहे. यामुळे चांदीच्या बाजारपेठेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी असंख्य दागिन्यांची व्हरायटी पहायला मिळत आहे.


चांदीचा दर दिवसेंदिवस गगनाला भिडले आहेत यामुळे चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा भ्रमनिरास झाला आहे. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी चांदीच्या आभूषणांची मागणी वाढल्याने व्यापारी वर्गाला एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

या संधीचे सोने करण्यासाठी चांदी उद्योजक कारागिरांनी कल्पकतेला वाव दिला आहे. यामध्ये चांदीचे किरीट, प्रभावळ, हात, कान, हार, त्रिशूळ, परसु, उंदीर, मोदक, दुर्वा, जास्वंदी फुले, आदी आभूषणांनी बाजारपेठ सजली आहे. एकंदरीत बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्तांसह चांदी उद्योजक कारागिरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.