केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे २०१९ पासून भाजप प्रवेशासाठी आतूर असलेल्या आवाडे यांना हाळवणकर यांच्या विराेधामुळेच प्रवेश करता आला नव्हता.
आवाडे यांचा पक्षप्रवेश अगोदरच निश्चित झाला होता; परंतु हाळवणकर यांनी आवाडे पिता-पुत्रांना घेऊन व्यासपीठावर यावे, अशी घोषणा माइकवरून करण्यात आली. त्यावेळी काही क्षण सारेच थबकले. पक्षाचा आदेश मानून हाळवणकर हसतहसत उठले आणि प्रकाश आवाडे व राहुल यांना दोन्ही हातांना धरून घेऊन ते व्यासपीठावर गेले आणि आवाडे यांची भाजप प्रवेशाची प्रतीक्षा संपुष्टात आली.