सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही रस्सीखेच दिसून येत आहे. मागील निवडणुकीत एकत्र असलेले शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्यात उमेदवारीसाठी महायुतीत स्पर्धा आहे.दुसरीकडे, महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्षाला ही जागा सुटणार असून शेकापकडून डॉ. अनिकेत देशमुख आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत निवडणुकीपूर्वीच उमेदवारीसाठी लढाई पाहायला मिळणार आहे.मागील निवडणुकीतील एकमेकांचे सहकारी दीपक साळुंखे आणि शहाजी पाटील यांच्यात उमेदवारीवरून स्पर्धा रंगणार आहे.
महायुतीमध्ये सांगोला मतदारसंघ विद्यमान आमदार असल्यामुळे शहाजीबापू पाटील यांना सुटण्याची शक्यता आहे. मात्र, साळुंखे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीतील मित्रांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा रंगणार आहे.महाविकास आघाडीत सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्षाला सुटण्याचे निश्चित आहे. या मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब देशमुख हे निवडणूक लढवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून तयारी करत आहेत.
शेकापची गेल्या पाच वर्षांत त्यांनी तालुक्यात बांधणीही केली आहे, त्यामुळे डॉ. बाबासाहेब यांना आगामी निवडणुकीसाठी शेकापची उमेदवारी मिळेल, असे वाटत असतानाच लोकसभा निवडणुकीपासून मात्र डॉ. अनिकेत देशमुख यांनीही निवडणूक लढविण्यासंदर्भात भाष्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, शरद पवार यांच्या भेटीनंतर ती घोषणा त्यांनी मागे घेत महाविकास आघाडीचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. मात्र, आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी निवडणुकीच्या अगोदरच इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून येत असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.