सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी निशिकांत पाटील यांचे स्वागत केले.त्यांना इस्लामपूर विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म अजित पवार यांच्या हस्ते निशिकांत पाटील यांना देण्यात आला. या पक्षप्रवेशावेळी आ.सदाभाऊ खोत, आ. इद्रिसभाई नायकवडी, प्रा.प्रभाकर जमदाडे सर, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केदार पाटील, इंजि. विरेंद्र राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आजच पाच जणांना पक्षात प्रवेश देऊन लगेचच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. इस्लामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनीही अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. त्याना इस्लामपूरमधून उमेदवारी देण्यात आली.
या मतदारसंघात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातत्याने निवडून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सातत्याने टीका करत आले आहेत. त्यामुळे यावेळी जयंत पाटील यांना मतदारसंघातच आव्हान देण्याची खेळी केल्याचे बोलले जात आहे.