भाजप जिल्हाध्यक्षाची खुर्ची झाली रिकामी! संग्रामसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू

भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) निशिकांत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इस्लामपूर विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष पदाची खुर्ची रिकामी झाली आहे.नवीन जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे महायुतीकडून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर इस्लामपूरमधून लढत आहेत, तर भाजपचे माजी खासदार संजय पाटील हे महायुतीकडून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातून लढत आहेत.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लक्षवेधी लढत या दोन मतदारसंघात होत आहे. निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली आहे. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षपद रिक्त होत आहे. या पदावर आता कोणाला संधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. जिल्हा सरचिटणीस मिलिंद कोरे यांचे नावही चर्चेत आहे.