पेठच्या टपाल कार्यालयात लाखाची रोकड लांबविली

वाळवा तालुक्यातील पेठ येथील टपाल कार्यालयातून दोघा चोरट्यांनी फाईल दाखवण्याचे निमित्त करत टेबलवर ठेवलेली १ लाख रूपयांची रोख रक्कम हातोहात लांबवत दुचाकीवरून पोबारा केला. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. याबाबत पोस्टमास्तर प्रणिता लिंबाजीराव धोबले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. टपाल कार्यालयात त्या कार्यालयीन कामकाज करत बसलेल्या होत्या.

पेठ कार्यालयातील १ लाख रूपयांची रोकड इस्लामपूरच्या विभागीय टपाल कार्यालयात पाठवण्यासाठी एकत्र बंडल करून ठेवलेली होती. दुपारी ३ च्या सुमारास एका चोरट्याने कार्यालयात प्रवेश करत त्यांच्यासमोर येऊन हातवारे करताना फाईल दाखवण्याचा बहाणा केला. याचवेळी त्याने तेथील १ लाख रुपयांच्या रकमेचे बंडल उचलून धूम ठोकली. कार्यालयाबाहेर दुचाकीवर थांबलेल्या दुसऱ्या साथीदाराच्या पाठीमागे बसून दोघांनी पोबारा केला. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.