महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरु, 288 मतदारसंघांसाठी ‘इतके’ उमेदवार रिंगणात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांचा अर्ज दाखल करण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची आणि पक्षांची चांगलीच धांदल उडाली. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्यात अखेरच्या एका दिवसात 4 हजार 996 उमेदवारांचे एकूण 6 हजार 484 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील 288 मतदारसंघांत एकूण 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधानसभेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. यानंतर आज 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. यानंतर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.