खानापूर मतदार संघातून माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांनी भाजपचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, आघाडीतून वैभव पाटील यांना संधी देण्यात आल्याने देशमुखांनी आटपाडीच्या स्वाभिमानासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांची उमेदवारी कायम असल्याने या ठिकाणी महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाचे सुहास बाबर, महाविकास आघाडीचे वैभव पाटील आणि अपक्ष देशमुख असा तिरंगी सामना होत आहे.
तर खानापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या वैभव पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांचे पारंपरिक विरोधक बाबर गटाचे सुहास बाबर यांच्याशी लढत गृहीत असताना अखेरच्या टप्प्यात आटपाडीची अस्मिता घेऊन माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आटपाडी तालुक्यात देशमुख वाड्यावर निष्ठा असलेला मतदार वर्ग आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी कुणाला लाभदायी ठरते की नुकसानकारक ठरते हे येणारा काळच सांगणार आहे.
सांगली, जत, खानापूर याठिकाणी बंडखोरी झाली असून अन्य ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढती होत आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यातील आठही मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मार्ग सुकर झाला असून जतमध्ये महायुतीला तर सांगली, खानापूरमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.