विटा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सदाशिव पाटील गटातून बंडखोरी करत ज्येष्ठ नेते विलास कदम आणि धर्मेश पाटील यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आणखी काही बड्या मंडळीचा शिवसेनेत प्रवेश होईल, असे संकेत महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी दिले. विटा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार सदाशिव पाटील गटाचे जेष्ठ नेते विलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अँड. धर्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक मंडळींनी शिवसेनेत प्रवेश करुन महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठींबा दिला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, अमोल बाबर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, अनिल म. बाबर, मार्केट कमिटी चे माजी सभापती आनंदराव पाटील, कृष्णत गायकवाड, अमर शितोळे उपस्थित होते. सुहास बाबर म्हणाले, अनिलभाऊंची पार्टी ही सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने उभी राहिलेली आहे. टेंभूच्या ६ व्या टप्प्याचे काम पूर्णत्वास जात आहे, ही अनिलभाऊंना खरी श्रद्धांजली आहे.
जी मंडळी टेंभू योजनेला दिवास्वप्न म्हणून हिणवत होते तीच मंडळी आता स्व. अनिलभाऊंच्या योगदानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यापूर्वी विरोधकांनी अनेकदा हाच मुद्दा उपस्थित केला. त्या त्या वेळी जनतेने विरोधकांना नाकारले आहे. अनिलभाऊ आयुष्याच्या अखेरपर्यंत टेंभूसाठी प्रयत्न करत राहिले. टेंभूच्या बाबतीत आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. विलासबापूंचे कुटुंब नैतिकतेने राजकरण करणारे आहे. आज भाऊंच्या माघारी या कुटुंबाने माझ्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
अँड. धर्मेश पाटील म्हणाले, वास्तविक अनिलभाऊ असताना आम्ही हा निर्णय घ्यायला हवा होता. त्यांच्या सोबत काम करण्याची आमची इच्छा होती. आज एकट्या आमच्या घुमटमाळ मध्ये शेकडो एकर ऊस भाऊंनी दिलेल्या टेंभूच्या पाण्यावर आला आहे. त्यांच्या पश्चात सुहास बाबर यांच्या पाठीशी उभे राहणे आमचे कर्तव्य समजतो. विट्यात सुहास बाबर याना मताधिक्य देऊ आणि त्यासाठी जीवाचे रान करू.