महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, ३०-३५ वर्षाच्या काळात जात पात बाजूला ठेवून १८-१८ तास काम केले आहे. आघाडीच्या राजकारणात शेकापच्या गणपतराव देशमुख यांना प्रामाणिकपणे साथ दिली. या वेळेला मला साथ द्या अशी देशमुख बंधूसह शहाजीबापू यांना विनंती केली होती. मात्र, त्यांनी पाठिंबा देण्यास नकार दिला. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार असून उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांगोला तालुका टेलला असल्याने टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी देण्याचा कायदा करावा. डाळिंब प्रक्रिया उद्योग सांगोल्यात आणावा. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ४० रुपयांचा हमीभाव मिळावा.

गलाई उद्योगाला सूक्ष्म व लघु उद्योगाचा दर्जा द्यावा, धनगर समाजाला मडग्याळ मेंढी प्रजनन केंद्र स्थापन करावे. महिलांच्या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्व.मीनाताई ठाकरे उद्योग भवनची निर्मिती करावी. प्रत्येक महामंडळाला ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली. उमेदवार दिपकआबांच्या भाषणाचा धागा पकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगोला तालुक्यातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असे अभिवचन सांगोलकरांना दिले.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे दिपकआबा साळुंखे पाटील हेच राहतील. यामध्ये कुणी चेल्या चपाट्यांनी हस्तक्षेप करू नये. ज्यांनी शिवसेनेशी आणि महाविकास आघाडीशी गद्दारी केली त्या सर्वांना घरी बसवून तालुक्यातील सुज्ञ मतदार सांगोला तालुक्यावर महाविकास आघाडीचा झेंडा आणि शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.
