खानापूर विधानसभा मतदारसंघात १९९० पासून सलग आठवेळा सातत्याने निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या बाबर गटाच्या हॅटट्रिकला यावेळी विरोधी पाटील व देशमुख गटांनी कडवे आव्हान दिले आहे.खानापूर मतदारसंघ हा माजी आमदार संपतराव माने यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासह या मतदारसंघाचे त्यांनी चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या अनिल बाबर यांनी वर्ष १९९० मध्ये विजय मिळवत विधानसभेत पहिल्यांदा पाऊल टाकले.
अनिल बाबर हे १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ असे सलग सात वेळा विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. त्यापैकी त्यांना १९९०, १९९९, २०१४, २०१९ या चार वेळा विजय मिळाला; पण त्यांना विजयाची हॅटट्रिक पूर्ण करता आली नव्हती. या काळात त्यांना प्रामुख्याने माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या गटाशी प्रत्येकवेळी संघर्ष करावा लागला. २०१४ व २०१९ च्या सलग दोन विजयांमुळे २०२४ च्या निवडणुकीत बाबर यांना हॅटट्रिकची संधी होती.
मात्र, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचे वारसदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे रिंगणात उतरले असून त्यांच्यापुढे राजेंद्रअण्णा देशमुख व वैभव पाटील यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. या तिरंगी लढतीत मतदारसंघातील जनता बाबर गटाला हॅटट्रिकची संधी देते की विरोधक त्यांचा हॅटट्रिकचा मनसुबा उधळतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.