महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. इस्लामपूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय काँग्रेस हा महाविकास आघाडीचा मुख्य घटकपक्ष आहे.
कुणालाही पक्षविरोधी भूमिका घेण्याचा अधिकार नाही, असे पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस अॅड. मनीषा रोटे, इस्लामपूर शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष अॅड. आकीब जमादार, जिल्हा प्रतिनिधी अॅड. आर. आर. पाटील, स्वयंरोजगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय कुलकर्णी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, महिला तालुकाध्यक्षा रंजना माळी प्रामुख्याने उपस्थित होते. बाळासाहेब पाटील म्हणाले, भाजपाचे सरकार सर्व आघाडीवर अपयशी ठरले आहे. पुन्हा एकदा स्वाभिमानी, वैभवशाली महाराष्ट्र घडवायचा आहे. आम्ही आमदार जयंत पाटील यांच्या प्रचारात आहोत.