18 तारखेला प्रचाराचा अवधी संपत असून त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात महायुती आणि मविआच्या नेत्यांनी प्रचाराचा, सभांचा धडाका लावला आहे. प्रचार संपायला काहीच दिवस असून त्यापूर्वी राज्यात ठिकठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत. इस्लामपूर विधानसभा ‘मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या प्रचारासाठी राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी आष्टा शहरात मॅरेथॉन बैठका घेऊन जोरदार प्रचार सुरू केला आहे.
शहरातील विविध भागांमध्ये कार्यकर्ते, नागरिक आणि मतदारांसोबत चर्चा करीत, त्यांनी पक्षाची धोरणे, विकासकामे आणि जयंत पाटील यांच्या योगदानाची माहिती दिली. प्रतीक पाटील यांनी प्रत्येक बूथवर जाऊन छोट्या-मोठ्या गटांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने चर्चा केली. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या नियोजनबद्ध बैठकांमुळे प्रचारात उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी आ. जयंत पाटील व माजी आमदार विलासराव शिंदे गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.