फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. राज्यातून थंडी गायब झाली असून पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झालेय. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात ढगाळ वातावरण असेल.’फेंगल’ चक्रीवादळ शनिवारी रात्री उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आदळले. ‘फेंगल’ चक्रीवादळ, आदळताच लगेचच विकसनाच्या उलट पायरीने झुकतच. वादळ कमकुवत होत त्याचे आज हवेच्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात २ ते ४ डिसेंबर( सोमवार ते बुधवार) असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर, भाग बदलत, अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः हा परिणाम, आज सोमवारी (२ डिसेंबर ला) दक्षिण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली ह्या महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यात अधिक जाणवेल. तर मंगळवार-बुधवारी (३ व ४ ला) नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली ह्या चार जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सध्या सोलापुरातील तापमान २३ अंश सेल्सिअस असल्याच पाहायला मिळत आहे. पुढील कांही दिवस सोलापूर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सोलापुरातील थंडीची लाट ओसरतानाचे चित्र दिसून येत आहे.