इचलकरंजी शहरात डिजिटल बोर्ड लावण्यास बंदी! प्रमुख चौकामध्ये एलईडी स्क्रीन बसवण्यास सुरुवात

इचलकरंजी शहरात डिजिटल बोर्ड लावण्यास बंदी आहे. अनेक अनधिकृत होल्डिंग सुद्धा काढले आहेत. त्यामुळे शहर सध्या होल्डिंग मुक्त आहे. शहरात मोठया प्रमाणात व्यावसायिक आहेत.अनेकांना त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्याची इच्छा आहे. परंतु होल्डिंगवर बंदी असल्यामुळे ते सध्या सोशल मीडियाद्वारे जाहिरात करत आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने एजन्सी मार्फत बसवण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर शहरातील व्यापान्यांच्या जाहिराती दाखवल्यास त्यामधून महापालिकेस आर्थिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

इचलकरंजी शहरामध्ये महापालिकेच्या वतीने एलईडी स्क्रीन उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे शहरातील प्रमुख चौक असलेल्या शिवतीर्थ चौक, धोरात चौक, नाट्यगृह चौक आणि स्टेशन रोडवरील अटलबिहारी वाजपेयी चौक या चार ठिकाणी एलईडी स्क्रीन बसवली जात आहेत. इचलकरंजी महापालिका झाल्यापासून स्मार्ट सिटी होण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत. शहरातील चार चौकात एलईडी स्क्रीन बसवण्यात येत आहेत.

या स्क्रीनवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच महापालिकेच्या वतीने देण्यात येणाच्या सुविधा अशा विविध प्रकारची माहिती या स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य चौकांत ही सुविधा दिली जाणार आहे. १४ फूट उंच व ६ बाय ८ स्केअर फूट अशी ही स्क्रीन आहे. यासाठी येणारा खर्च भागविण्यासाठी जाहिराती करण्याचा  प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. यामुळे महापालिकेच्या विविध निर्णयांची माहिती सहजपणे नागरिकांना पाहावयास मिळणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.