विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांत पाटील यांनी समर्थकांच्या चिंतन बैठका घेऊन ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा’ असा संदेश दिला आहे.जयंत पाटील गटाला घासून मिळालेला विजय व निशिकांत पाटील यांच्या गटाला निसटता झालेला पराभव जिव्हारी लागला. इस्लामपूर नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत आता काटे की टक्कर होऊन अस्तित्वाची लढाई सुरू होणार असल्याने तालुक्यात मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची स्थिती आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून चिंतन सुरू आहे. जयंत पाटील यांच्या गटाकडून कमी झालेल्या मताधिक्यावर गावोगाव समर्थकांत अस्वस्थता आहे. कृष्णाकाठ, आष्टा परिसरातून मिळालेले थोड्या मताधिक्यामुळे कार्यकर्त्यांनी ना जल्लोष केला ना विजयाचा आनंद साजरा केला. जयंत पाटील राज्यात हेवीवेट नेते म्हणून ओळखले जातात. ३५ वर्षांत त्यांनी विरोधकांना मताधिक्याच्याबाबतीत जवळपास फिरकू दिले नाही.आठव्यांदा मात्र निशिकांत पाटील यांनी त्यांची दमछाक केली. त्याला कारणे अनेक आहेत. ऊस दराचा मुद्दा, स्थानिक नेत्यांची अरेरावी, स्थानिक नेत्यांचा अतीआत्मविश्वास ही प्रमुख कारणे चर्चेत आहेत. जयंत पाटील यांचे मताधिक्य घटले.
जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची गाठभेट न घेता पाच दिवसांनी इस्लामपूर येथे प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेत ईव्हीएमवर शंका उपस्थित करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा असे सांत्वन केले.गेल्यावेळी जिल्हा परिषद निवडणूकीत वाळवा तालुक्यात विकास आघाडी करुन ‘राष्ट्रवादी’ ला बरोबरीत रोखले होते. विकास आघाडीकडून चार सदस्य जिल्हा परिषद सभागृहात गेले. वाळवा पंचायत समितीत सात सदस्य निवडून आले.
पालिका निवडणुकीत काँटे की टक्कर होऊन नगराध्यक्ष म्हणून निशिकांत पाटील निवडून आल्याने जयंत पाटील यांच्या ३० वर्षांच्या सत्तेला हादरा बसला. एक अपक्ष नगरसेवक दादासाहेब पाटील यांनी ‘राष्ट्रवादी’ला पाठिंबा दिल्यामुळे संख्याबळ एकने अधिक झाले. आता निशिकांत पाटील, गौरव नायकवडी, राहुल महाडिक, आनंदराव पवार, विक्रम पाटील, सदाभाऊ खोत या जयंत पाटील विरोधकांना एकीची ताकद समजून आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांत संघर्ष होईल.