हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता अतिग्रे फाटा येथे नात्यातील संवाद रनवॉक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थी आणि पालकांनी यामध्ये मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते माजी आमदार राजीव किसन आवळे यांनी केलं आहे.
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे फाट्यावर सकाळी ठिक ७ वाजता भव्य शालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते माजी आमदार राजीव किसन आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना राजीव आवळे म्हणाले सध्या मोबाईल अति वापरमुळे नात्यातील संवाद संपत चालला आहे. हा संवाद पुन्हा वृद्धिंगत व्हावा यासाठी रनवॉक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
जो विद्यार्थी आई-वडील किंवा पालकांच्या सोबत या स्पर्धेत सहभागी होईल त्या कुटुंबाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. इयत्ता ५ वी ते ७ वी साठी रुकडी फाटा ते चोकाक परत रुकडी फाटा अशी तीन किलोमीटर स्पर्धा असणार आहे.तर ८ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी रुकडी फाटा ते माले फाटा आणि परत रुकडी फाटा अशी ५ किलो मीटरची स्पर्धा असणार आहे. या दोन्ही स्पर्धासाठी पालक सुद्धा सहभागी होऊ शकतात.
ही स्पर्धा विनामूल्य असून १४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धे पूर्वी झुंबा योगाचेही आयोजन केले आहे. यामध्ये सहभागी स्पर्धकांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांना स्पर्धा
मार्गावर हायड्रेशन सपोर्ट दिला जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसह पालकांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दरम्यान या पत्रकार परिषद प्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य सौ. स्मिता आवळे, हातकणंगले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष ऍड राहुल आवळे, तालूका राष्ट्रवादी महिला आघाडी प्रमुख शारदा पाटील, संग्रामसिंह जाधव, ललित नवनाळे, सागर मोरे, शुभम शिंदे उपस्थित होते.