हातकणंगलेनजिक कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, परीसरात हळहळ

सांगली – कोल्हापूर रस्त्यावर हातकणंगले हद्दीत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास  हॉटेल ग्रास होपर समोर भरघाव चारचाकीची जोराची धडक बसून दुचाकीवरील अशितोष दिलीप कांबळे (वय ३५, रा. हातकणंगले) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुपारी दोन वाजणेच्या सुमारास झाला. अधिक माहिती अशी की, मयत अशितोष कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वांवर नोकरीस होते.

सांगली – कोल्हापूर रस्त्यावरील बुधले मंगल कार्यालय येथे एका विवाहास उपस्थित राहण्यासाठी इचलकरंजीहून कांबळे हे आपल्या दुचाकी (क्र. एमएच ०९ एल डी ७९९६) वरून निघाले होते. मंगल कार्यालयानजीक आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने कोल्हापूरहून अक्कलकोटकडे निघालेल्या चारचाकी (क्र. एमएच ०९ जी एम ७१७६) ने पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, चारचाकी वाहनाने मयत कांबळे यांच्यासह दुचाकी वाहनाला शंभर फूट फरपटत नेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर कार चालक संदीप अर्जुन पाटील (रा. कोल्हापूर) याच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. हातकणंगले ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  मयत कांबळे हे इचलकरंजी महापालिकेत नोकरीस होते.  कुटूंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांचे अपघाती निधन झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.