सध्याच्या काळात अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढू लागले आहे. अनेक कारणामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. पेठ- शिराळा रस्त्यावर वाळवा तालुक्यातील रेठरेधरण नजीक दुचाकी-ट्रकची सामोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. सोमनाथ शिवाजी दाभाडे (वय 29 , रा. तडवळे, ता. शिराळा) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी ट्रक चालक कृष्णा नारायण इंगळे रा. नारायणवाडी, जि. बीड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोमनाथ हा पुणे येथील खासगी कंपनीत कामाला होता. तो न्यायालयातील कामकाजासाठी तडवळे येथे आला होता. बुधवारी सायंकाळी सोमनाथ हा दुचाकीवरून पुणे येथे जाण्यासाठी निघाला. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास रेठरेधरणनजीक पेठच्या दिशेने आलेल्या ट्रकने (एमएच 10 डीडी 7795) दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत सोमनाथ याच्या डोक्याला, पायाला गंभीर मार लागला. सोमनाथ याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. सोमनाथ याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, भाऊ ,भावजय असा परिवार आहे.