सध्या अनेक भागात वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. अनेक ठिकाणी बस स्थानकावर बसगाड्या वेळेवर येत नसल्या कारणाने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार सांगोला तालुक्यात दिसत आहे. एसटी बस ही ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी आहे. हजारो लोक एसटी बसमधून प्रवास करत असतात. त्यातून एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा महसूल गोळा होत असतो. त्याच उत्पन्नातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार केला जातो. त्याद्वारे प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा असे अपेक्षित असते. मात्र तसे होताना दिसत नाही.
सांगोला आगारातून सुटणाऱ्या गाड्यांची अवस्था दयनीय आहे. वेळापत्रकाची दाणादाण उडाली आहे. गाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. प्रवाशांना होणाऱ्या या त्रासाचे आगार व्यवस्थापकाला काही देणे घेणे नाही. नेतेही हवेत उडत आहेत. आलिशान फॉर्चूनर गाडीतून उतरून या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर काम करण्यास त्यांना वेळ नाही. सांगोला तालुक्याचे हे खूप मोठे दुर्दैव आहे. निवडणुका संपल्या असल्याने जनतेला कोलण्याचा हा प्रकार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता प्रवाशी वज्रमूठ आवळू लागले आहेत.
याबाबत माहिती देताना एसटीचे नियमित प्रवाशी उत्तम गेंड म्हणाले की, तालुक्यातील ग्रामीण एसटीच्या सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे तालुकावासियांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत मी आगारप्रमुख विकास पोफळे यांना बऱ्याच वेळा बोललो. पण काहीच सुधारणा होताना दिसत नाहीत. उलट त्यात वाढच झाली आहे. विभाग नियंत्रक सोलापूर यांचा वरदहस्त असल्याने कोणालाच जुमानत नाही. हा अधिकारी आमच्या तालुक्यात नोकर आहे. पण याचा साहेबी थाट न्याराच आहे. केलेल्या कोणत्याच तक्रारीची दखल घेतली जात नाही. यांना आपल्या अधिकार कर्तव्याची जाण नाही. शालेय मुले, महिलावर्ग तसेच अबालवृद्ध यांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे.
आज ग्रामीण भागातील एकही एसटी वेळेवर धावत नाही. ज्या गाड्या सर्वाधिक उत्पन्न देतात त्यांनाही यांनीच खोडा घातला आहे. गेली पाच दिवसापासून घेरडी मार्गावरील एकही गाडी वेळेवर सोडली गेली नाही. सोमवारी सायंकाळी साडे पाचची जत आणि नराळे मुक्कामी गाड्या दोन्ही संगेच सोडल्या. मग कसे उत्पन्न मिळेल. उलट यामुळे आम्हाला त्रास सोसावा लागत आहे. गाड्या उशिराने सोडल्या जातात. याबाबत नियंत्रण कक्षातून माहिती दिली जात नाही. जर गाड्या उशिराने दिल्या तर मुक्कामी जातील की नाही याची शाश्वती नाही. यामध्ये सुधारणा झाली नाही तर येत्या २६ तारखेला आंदोलन करण्यात येणार आहे.
