रस्ता रुंदीकरणाची इचलकरंजी शहरवासियांतून मागणी

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरांमध्ये विकासकामांचा धडाका सुरू आहे. परंतु अशा काही अनेक समस्या देखील आहेत ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन देखील करावा लागत आहे. इचलकरंजी शहराची दिवसेंदिवस वाढ होत चालेली आहे. सांगली रोड परिसरात विस्तार वाढीचा वेग हा मोठा आहे. या भागातील मुख्य रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत चालल्याचे चित्र दिसत आहे.

राजवाडा चौक ते महासत्ता चौक, बिग बाजार ते वडगाव बाजार ते जय सांगली नाकापर्यंत रस्ता रुंदीकरणाचा निर्णय काही वर्षांपूर्वी तात्कालीन नगरपालिका प्रशासनाने घेतला होता. त्या रस्त्यालगत स्थावर मालमत्ता धारकांनी विरोध न करता सहकार्याची भूमिका घेतली. रस्ता रुंदीकरणासाठी शासकीय मोजणीसाठी शासनाला लाखो रुपये फी पोटी भरले आहेत.

मात्र या रस्त्याची शासकीय मोजणी पूर्ण झालेली नाही. त्यासाठी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून म्हणावा तसा पाठपुरावा केला जात नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढत चाललेली आहे. तेव्हा आणखी किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा सवाल सध्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी लक्ष द्यावे आणि रस्ता रुंदीकरण तातडीने करावे अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.