सांगोला येथील अंबिकादेवी यात्रेनिमित्त उद्या होणार जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम

अनेक भागात सध्या यात्रा सुरु आहेत. या यात्रामध्ये अनेक कार्यक्रम घेतले जातात. अनेक भागात बैलगाडी शर्यती देखील घेतल्या जातात. सांगोला येथील अंबिकादेवी यात्रेस गुरुवार, ३० जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. बुधवार, २९ जानेवारी रोजी जागा वाटप करण्यात आले. शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी आकर्षक दारुकामाने सांगोला यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत शेती विषयक प्रदर्शन, विद्यार्थ्यांच्या व महिलांच्या विविध स्पर्धा, जंगी कुस्त्या, शोभेचे दारूकाम कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

मंगळवार दि.4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी महापूजा, महानैवेद्य व रात्री 9 वा. भजनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि.5 फेब्रुवारी रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गुरुवार दि.6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. शेतीमालाची निवड करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता बक्षीस समारंभ सायं. 7 वाजता शोभेच्या दारूकामाने सांगता करण्यात येणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता श्री. अंबिकादेवी पालखीची यात्रेतून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

यात्रा कालावधीत श्री दत्त महिला भजनी मंडळ (महादेव गल्ली), यमाई महिला भजनी मंडळ (देशपांडे गल्ली), श्रीराम महिला भजनी मंडळ (महादेव गल्ली), श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ (वज्राबाद पेठ), जय तुळजाभवानी महिला भजनी मंडळ (वज्राबाद पेठ), श्री विठ्ठल महिला भजनी मंडळ (कोष्टी गल्ली), ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ (वासूद रोड), स्वामी समर्थ भजनी मंडळ (कुंभार गल्ली), साई महिला भजनी मंडळ (वासूद रोड), बसवेश्वर भजनी मंडळ (मेन रोड), दत्त भजनी मंडळ (पुजारवाडी), चौंडेश्वरी भजनी मंडळ (कोष्टी गल्ली), रुद्र भजनी मंडळ (सांगोला), श्रीराम महिला भजनी मंडळ, एखतपूर आदी भजनी मंडळाचे भजन होणार आहे.

मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी खिलार जनावरांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी कोसा खिलार व पांढरा खिलार असे दोन गट तयार करण्यात आले असून प्रथम क्रमांकासाठी 5 हजार रुपये व द्वितीय क्रमांकासाठी 3 हजार रुपये असे पारितोषिके देण्यात येणार आहेत.