सध्याच्या काळात अपघाताच्या प्रमाणात भरमसाठ वाढ होत असल्याचे चित्र दिसतच आहे. अनेकांना आपले काम गमवावे लागले आहेत.सांगली येथील लक्ष्मी फाट्यानजीक चारचाकी गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात इस्लामपूर येथील धर्मगुरूंचा जागीच मृत्यू झाला.हफीज अलीम मन्सूर बारस्कर (वय ५०, रा. इस्लामपूर) असे त्यांचे नाव आहे. तर तिघे जखमी झाले. अस्लम मिस्त्री (६२), समीर सरवर मुल्ला (५०), फैय्याज लीयाकत इबुशी (५२ सर्व रा. इस्लामपूर) अशी त्यांची नावे आहे. यातील समी मुल्ला हे गंभीर जखमी आहेत.
दुपारी चारच्या सुमारास अपघात झाला. याबाबत रात्री उशिरा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत बारस्कर हे इस्लामपूर येथील आहेत. धर्मगुरू असल्याने समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. सांगलीतील एका कुटुंबात भेटीसाठी ते येणार होते. दुपारी चारच्या सुमारास इस्लामपूर येथील अस्लम, समीर आणि फैय्याज यांच्यासमवेत चारचाकी (एमएच १४ बीसी ६६२४) गाडीतून आष्टा मार्गे सांगलीकडे येत होते. त्यावेळी लक्ष्मीफाट्यानजीक त्यांच्या चारचाकी गाडीच्या पुढील बाजूचे टायर फुटले आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नव्या सिमेंटच्या रस्त्यावरून ती गाडी खड्ड्यात जात समोरील विद्युत खांबाला जोरदार आदळली.त्यात हफीज बारस्कर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच समीर मुल्ला गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर तत्काळ रुग्णवाहिकेतून जखमींना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. फैय्याज आणि अस्लम यांची प्रकृती स्थिर असून समीर हे अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
दरम्यान, अपघात इतका भीषण होता की नव्याने उभारण्यात आलेला विद्युत खांब अक्षरशः घटनास्थळी वाकला होता. ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला असून याबाबतची नोंद केली आहे. श्री. बारस्कर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजतात समाजबांधव मोठ्या संख्येने शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
