आदर्श पब्लिक स्कूल सी. बी. एस. ई. मध्ये जिल्ह्यातील मोठा आठवडी बाजार व फूड फेस्टिवलचे आयोजन केले होते. या आठवडी बाजार व फूड फेस्टिवलचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांच्या हस्ते झाले. या आठवडी बाजारातून व फूड फेस्टिवलमधून केवळ पुस्तकी नव्हे तर व्यवहारिक ज्ञानही मिळावे, खरेदी-विक्रीची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा आठवडा बाजार फूड फेस्टिवल भरवण्यात आला. शाळेतील आठवडी बाजारातून विद्याथ्यांनी आपापल्या मालाची विक्री केली. भाजी घ्या अशा आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करत आपल्या जवळच्या मालाची विक्री केली.
या आठवडी बाजारात खाद्यपदार्थ, भाज्या, फळे, कडधान्य, सरबत, वडापाव, मोमोज, कटलेट, गुलाब जामुन असे अनेक पदार्थ विक्रीस ठेवले होते. विद्याथ्यांनी आपापल्या पदार्थाचे बॅनर लावून व आरोळ्या देऊन आपल्या मालाची विक्री केली. या आठवडी बाजारासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील, संस्थेच्या संचालिका जयश्री पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, प्रणिती पाटील, संस्थेचे संचालक विशाल पाटील, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील यांनी भेट देऊन मुलांचा आनंद द्विगुणित केला आणि महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
प्राचार्य डॉ. राजेश ओहोळ यांच्या प्रयोगशील संकल्पनेतून या आठवडी बाजाराचं व फूड फेस्टिवलचे नेटके संयोजन केले. या महोत्सवासाठी उपप्राचार्य संतोष मेनन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, ग्राहक, उपस्थित होते.