सध्या गुन्हेगारी प्रकारात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर महिलांमध्ये असुरक्षितता देखील पहायला मिळत आहे. जात तालुक्यातील करजगी येथील चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेच्या विटा शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी विटा शहरात सर्वपक्षीय नेते व नागरिक रस्त्यावर उतरले. शहरातून विराट मोर्चा काढत नराधमास चौकातच नागरिकांच्या साक्षीने फाशी द्यावी, अशी संतप्त मागणी यावेळी आंदोलनकर्त्यानी केली.करजगी येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.
या पार्श्वभूमीवर विटा शहरात विविध सामाजिक संघटना व सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला होता. सकाळपासून शहरातील सर्व व्यापारी बाजारपेठ बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला. सकाळी ११ वाजता शहरातून सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी एकत्र येत तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला.
यात चंद्रहार पाटील, अमोल बाबर, वैभव पाटील, शंकर मोहिते, शिव शिंदे, संदीप ठोंबरे, साजिद आगा यांच्यासह सर्व पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी चंद्रहार पाटील यांनी चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमास सांगलीच्या चौकात गोळ्या घालाव्यात, असे सांगून हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली.
यावेळी शंकर मोहिते, शिव शिंदे, पुष्पा बोबडे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी या घटनेतील संशयिताला अटक करून पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी मिळेल, यासाठी पोलिस प्रशासन काम करीत असल्याचे सांगितले.
वैभव पाटील म्हणाले, कायदा व व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होत आहे. अशा नराधमांना कडक शिक्षा झाली पाहिजे. हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा. अमोल बाबर म्हणाले, जतची घटना निषेधार्थ असून सुहास बाबर यांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांच्या संतप्त मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविल्या जातील.
