इचलकरंजी महापालिकेची जिल्हाधिकाऱ्यांकडून होणार चांगलीच झाडाझडती ?

 इचलकरंजी शहराची वस्त्रनगरी म्हणून सर्वत्र ख्याती आहे. येथील यंत्रमाग असतील किंवा येथील पाण्याचा प्रश्न तसेच राजकीय वातावरण यामुळे इचलकरंजी महापालिका ओळखीची आहेच. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जिल्ह्यात ओळख तयार झाली आहे. कामाचा निपटारा वेळेत झाला पाहिजे, जनतेला त्रास होता कामा नये, अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली पाहिजे यावर त्यांचा भर राहिला आहे.

इचलकरंजी येथील स्थानिक राजकाराणातून आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून प्रशासकपदाचा कार्यभार काढून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपविण्यात आला. राज्यात अशी बहुदा पहिलीच घटना असावी. पदभार आल्यानंतर अद्याप जिल्हाधिकारी महापालिकेत आले नसले तरी त्यांनी येथील कामकाजावर कोल्हापुरातून बारकाव्याने लक्ष ठेवल्याचे दिसते. बुधवारी अनपेक्षितपणे त्यांनी विविध यंत्रणेमार्फत शहरात चालू असणारी विकास कामे विविध योजना व उपायुक्त, सहायक आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह विविध अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारी  बाबतचा अहवाल मागवला.

याचा निरोप आल्यानंतर महापलिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. बुधवारी दिवसभर सर्व विभाग कर्मचारी माहिती संकलनाच्या कात व्यस्त होते. गुरुवारी राहू काळ संपल्यानंतर उपायुक्त प्रसाद काटकर, सहायक आयुक्त विजय राजापुरे यांनी जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांच्याकडे अहवाल सादर केला.  महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला असला तरी जिल्हाधिकारी कुणाच्या वर्मावर बोट ठेवता, कुणाची झाडाझडती होणार याची चांगलीच धास्ती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते.