पालकमंत्री आबिटकर, आम. अशोकराव माने यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत चर्चा करुन हा तिढा सोडविण्याची मागणी

सध्या प्रत्येक भागात काही ना काही मुद्दा हा खूपच जोर धरू लागतो. सध्या अनेक भागातील यात्रा उत्सव सुरु आहेत. अनेक विविध कार्यक्रमांचे नियोजन देखील या यात्रा कालावधीत करण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी येथील हुतात्मा स्मारकाचा आवर्जून उल्लेख केला जातो.  सालाबादप्रमाणे यात्रा कमिटी देवीच्या यात्रा उत्सवाची तयारी  करत असते. मात्र चालू वर्षी नगरपरिषदेने कर वसुलीचा ठेका दिल्याने गावकरी विरुद्ध नगरपरिषद असा गंभीर प्रसंग पहायला मिळाला आहे. मुळातच हे स्मारक पटांगण महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहे.

नगरपरिषदेला देखभालीसाठी अधिकार आहे. दोन्ही यंत्रणा कागदी घोडे नाचवत आहेत. मात्र नगरपरिषद एकप्रकारे जबाबदारी ढकलून रिकामे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या यात्रेचे काय या जनतेच्या प्रश्नाचे उत्तर अजुनही मिळाले नाही. यात्रा कमिटीने ठेकेदाराने जबरदस्तीने आणलेले पाळण्याचे साहित्य बाहेर काढण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. आता मुद्दा आहे ठेकेदाराने जबरदस्तीने कुलूप तोडून प्रवेश करीत आणलेल्या पाळण्याचे साहित्य बाहेर काढण्याचा. या प्रसंगातून कायदेशीर पेच निर्माण झTलT आहे.

तहसीलदारांनी नगरपरिषदेला दिलेल्या आदेशानसार अंमलबजावणी न झाल्याने अखेर ग.नं. ८५२ येथील स्मारक पटांगण प्रवेशद्वाराला कुलूप लावून सीलबंद केले आहे. यामुळे हुतात्मा स्मारक पटांगण आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आम. अशोकराव माने यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करुन हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जनतेमधून होत आहे.

हुपरी येथील हुतात्मा स्मारक पटांगणावर पाळणे खेळणी लावण्यावरून यात्रा कमिटी व खासगी ठेकेदार यांच्यातील वाद मिटायला तयार नाही. अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी नगरपरिषदेला ठेकेदारांचे पाळणे बाहेर काढण्याचे आदेश दिले मात्र यांवर कार्यवाही न झाल्याने मंडल अधिकारी प्रदिप शिंदे व तलाठी एस.पी. जाधव यांनी स्मारकाच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावून सीलबंद केले आहे. यामुळे पाळण्याशिवाय यात्रा होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.