सध्या अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना वणवण करावी लागते. तसेच अनेक भागात दूषित, मळीयुक्त पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळवा तालुक्यातील बागणी येथे वारणा नदी मध्ये मळीमिश्रित पाणी हे नित्याचे बनले आहे. वारंवार होणाऱ्या पाणी प्रदूषणाने नदीतील जलचर प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नदीकाठी वास्तव्य असलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले काही दिवसापासून वारणा नदीमध्ये मळी सदृश रासायनिक पाणी मिसळल्याने नदीचे पाणी काळे बनले आहे. याच पाण्यावर बागणी, काकाचीवाडी व शिगांव गावातील पाणीपुरवठ्याच्या योजना अवलंबून असल्याने त्या गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. काही दिवसांपूर्वी मळीमिश्रित पाणी सोडल्याने दूषित पाण्यामुळे कावीळ सदृश साथीने थैमान घातले होते प्रदूषण नियंत्रण विभागाने यावर गांभीर्याने लक्ष देऊन प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.