सध्या अनेक भागातील स्वच्छताचा प्रश्न खूपच गंभीर बनत चाललेला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अनेक नवनवीन आजार अद्वभवत आहेत. सध्यस्थितीत हातकणंगले तालुक्यातील साजणी गावाचा विस्तार व लोकसंख्या, कुटुंबसंख्या वाढत असून या परिस्थितीत गावापुढे प्लास्टिक कचऱ्याची समस्या सर्वांना भेडसावत आहे.
यासाठी ग्रामपंचायतकडून घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन केला जातो. परंतु यामध्ये ओला व सुका कचरा नागरीक एकत्रित करून घंटागाडीत टाकत असतात. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे अवघड झाले आहे. तसेच ओला घनकचरा प्रकल्पाला पाठविला जातो किंवा कुजवला जातो. परंतु प्लास्टिक कचरा कुजत नसलेमुळे ज्या ठिकाणी कचरा संकलित केला जातो, त्याठिकाणी अस्ताव्यस्त पसरत जातो. त्यामुळे तेथील नागरिकांना त्याचा त्रास होत असून ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी येत आहेत.
या सर्वांवर उपाय म्हणून ग्रामपंचायतीकडून येणाऱ्या काळात फक्त ओला कचराच संकलित केला जाणार आहे व प्लास्टिक कचरा यामध्ये प्रामुख्याने पॉलीथीनच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तु, कागदी बॉक्स, पुठ्ठा, वर्तमानपत्राची रद्दी या वस्तु साजणी ग्रामपंचायत दहा रुपये किलो बाजारभावाने खरेदी करणार आहे. तरी गावातील नागरीकांनी वरीलप्रमाणे कचऱ्याचे वर्गीकरण करून गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आपल्या घरातील कचरा इतरत्र न टाकता तो घरामध्ये संकलित करून ग्रामपंचायतीस विकत द्यावा. त्याचबरोबर आपले घर, परिसर व गाव प्लास्टिक मुक्त करण्यास योगदान द्यावे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
साजणी ग्रामपंचायतीने प्लास्टीक मुक्त गाव करण्याचा निर्णय घेतला असून पॉलीथीनच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तु, कागदी बॉक्स, पुठ्ठा, वर्तमानपत्राची रद्दी या वस्तु ग्रामपंचायत दहा रुपये किलो बाजारभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे सदर सुका कचरा इतरत्र कुठेही टाकू नये, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.