आळसंद येथे सौ. शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालयात व्याख्यान उत्साहात

खानापूर तालुक्यातील आळसंद येथे सौ. शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालयाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. जसा सोन्याचा अलंकार बनतो. दगडाची सुंदर मूर्ती बनवली जाते तसा माणसांचा व्यक्तिमत्व विकास एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे निश्चितपणे होत असतो, असे प्रतिपादन दीपक पवार यांनी केले. पत्रकार दीपक पवार म्हणाले, एनएसएसमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या विद्यार्थ्यांचे जीवनच उजळून जाते.

आत्मविश्वासाचे एक तेज त्यांच्यामध्ये निर्माण होते धाडसी वृत्ती निर्माण होऊन व्यक्तिमत्त्वाला  आकार येतो. राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यक्तिमत्व विकास यांचा खूप जवळचा संबंध आहे. बंधारा बांधणे, जलसंधारणाची कामे, पाणी आडवा पाणी जिरवा, जल है तो कल है असे विविध उपक्रम राबवत असताना स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू प्राप्त होत असतात. जीवनामध्ये येणाऱ्या कोणत्याही कठीण प्रसंगी कोलमडून न जाता प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे सामोरे जाणे राष्ट्रीय सेवा योजनेमुळे होऊ शकते. आपल्यातील चांगले गुण ओळखून, त्या गुणांचा विकास केला पाहिजे.

रमेश कोष्टी म्हणाले, मोबाईलचा वापर करून आपण स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधणे शक्य आहे. कोणतेही काम प्रामाणिकपणे आनंद घेऊन केल्यास त्याचे फळ निश्चित मिळते आणि त्यातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
प्रास्ताविक नेहा चव्हाण यांनी केले. नियोजित उपक्रमामध्ये गावामधून प्रबोधनपर रॅली काढण्यात आली. माझी वसुंधरा, आरोग्य, वृक्षारोपण, पाणी वापर, स्वच्छता, सेंद्रिय शेती, पर्यावरण स्वच्छता अशा महत्त्वपूर्ण विषयासंबंधी घोषवाक्ये देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाऊन पुन्हा शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली. या प्रबोधनफेरीद्वारे आळसंद गावातील माजी वसुंधरा अभियानाला विशेष योगदान देण्यात आले.