आळसंद येथे पर्यावरणप्रेमींकडून वनराई बंधाऱ्याची निर्मिती!  पाणी आडवा, पाणी जिरवा या संकल्पनेची पूर्ती 

अनेक भागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचा नागरिकांना पुरेपूर लाभ मिळत असतो. आळसंद येथे सौ. शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरातील स्वयंसेवकांनी वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. यावेळी स्वयंसेवकांनी गावात पर्यावरण जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढली. या फेरीत माझी वसुंधरा माझी जबाबदारी, शाश्वत विकास, जलव्यवस्थापन, वायुप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, प्लास्टिक बंदी आणि सेंद्रिय शेती या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रबोधन केले.

यामध्ये ग्रामस्थ, युवक आणि स्वयंसेवक यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रमदानातून मातीची पोती टाकून वनराई बंधारा बांधला, त्यामुळे पाणी आडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला प्रत्यक्ष सत्यात उतरवले. तसेच, यामुळे त्या वनराई बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. या उपक्रमामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढेल, विहिरींना भरपूर पाणी मिळेल आणि शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. परिणामी, पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये जलसंधारण आणि पर्यावरणविषयक जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण झाली. भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबवावेत असा कृतीतून संदेश दिला. सदर दिवशी जीवन प्रबोधिनी संस्थेचे सौ. शोभाकाकी बाबर कन्या कॉलेज आणि आरोग्यवर्धिनी केंद्र, आळसंद यांच्या संयुक्त विद्यमाने टी. बी या विषयावर आळसंद आरोग्य विभाग यांचेकडून जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कुष्ठरोग आणि टी. बी रोगाची लक्षणे सांगून यावर सरकार मोफत उपचार देत आहे. कोणताही आजार न लपवता वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. 

सदर दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये बहुतांशी स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये  शिवजन्माचा पाळणा, बहारदार लावण्या, प्लास्टिक निर्मूलनावर संदेश देणारा मंगळागौरचा कार्यक्रम, रिमिक्स गाणी, शिवाजी महाराजांचा पोवाडा अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले.