सध्या गुन्हेगारीच्या प्रकारात खूपच वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक भागात दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील मधुकर नारायण दबडे (वय ५८) यांचा बंगला फोडून अज्ञात चोरट्याने १५१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३०० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ६ लाख ४३ हजारांची रोकड असा सुमारे २० लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
गोमेवाडीत भर दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३० या चार तासांच्या कालावधीत घटना घडली आहे.मधुकर दबडे यांचा बंगला करगणी रस्त्यावर दबडे वस्तीवर आहे. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे दुकानात गेले होते घरातील सर्वजण आटपाडीला चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले गळ्यातील चेनमधील सोन्याचे गंठण, गळ्यातील चेन, गंठण, मिनी गंठण, कानातील टॉप्स, सोन्याचे झुमके व बेल, तीन सोन्याची नाणी, दोन बदाम, चांदीचे पैंजण व जोडवी आणि ६ लाख ४३ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल घेऊन चोरट्याने पलायन केले आहे.गोमेवाडी गावात ही माहिती कळताच ग्रामस्थानी गर्दी केली होती. घरफोडीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपास सहाय्यक पोलीस पास निरीक्षक रमेश जाधव करत आहेत.
