आटपाडी तालुक्यातील करगणी येथे आयोजित माणगंगा बचाव समितीची सभा आयोजित केली होती. माणगंगा सहकारी साखर कारखाना विकू देणार नाही आणि सूतगिरणीचाही हिशेब द्यायला लावणार आहोत. सूतगिरणी विकत घेऊन दोनशे कोटी कमावले. आता कारखाना विकत घेऊन तीनशे कोटी कमावण्याचा यांचा डाव आहे. सहकारी संस्थेवर कर्ज काढायचे, ती बंद पाडून विकत घ्यायची आणि फक्त लुटायचं, हा धंदाच अमर, अकबर, अँथोनी या टोळीने सुरू केल्याचा थेट आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देशमुख बंधूंचे नाव न घेता केला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, बचाव समितीचे अध्यक्ष तानाजी लवटे, विनायक पाटील, जयवंत सरगर, वसंत हाके, तात्यासाहेब व्हनमाने, नाथा सरगर, महादेव पाटील, विष्णू अर्जुन, साहेबराव खिलारी यांच्यासह शेतकरी, सभासद उपस्थित होते.
खोत म्हणाले, बारामतीकर आणि त्यांचे सहकारी म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी आहे. राज्यातील अनेक सहकारी कारखाने तोट्यात चालवून, बंद पाडून, ते पुन्हा विकत घेतले गेले आहेत. त्यानंतर मात्र वैयक्तिक खासगी मालकीत हे कारखाने फायद्यात चालतात. हे तंत्र डोक्याबाहेरचे आहे. जिल्हा बँकही ‘अलीबाबाची गुहा’ आहे. माणगंगा कारखाना शेतकऱ्यांनी फुकट दिलेल्या जमिनीवर उभारला गेला. जमीन दिलेल्या शेतकरी व कामगारांसाठी लढा उभारून आम्ही न्याय देऊ. माणगंगा कारखाना विकू देणार नाही, याशिवाय सूतगिरणीच्या व्यवहाराचाही हिशेब द्यायला त्यांना भाग पाडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, देशमुख कुटुंबाने सूतगिरणी व बँकेत गैरव्यवहार केले आहेत. सूतगिरणीचा व्यवहार रद्द होणार आहे. सूतगिरणीची शासकीय देणी २४ कोटी असताना फक्त १० लाख भरले आहेत. ती पुन्हा सहकारात दिल्याचे देशमुख सांगत आहेत. सूतगिरणीची शासकीय देणी भागवण्यात आलेली नाहीत. सूतगिरणीच्या जमीन विक्रीतून २०० कोटी कमावलेत, त्यातून शासकीय देणी का दिली नाहीत? हे त्यांनी सांगावे. कारखान्यासाठीही हेच तंत्र वापरून पुन्हा जमीन विक्रीचा धंद देशमुख यांना करायचा आहे. कारखान्यासाठी शिक्षकांच्या पगाराव- कर्जे काढली आहेत. शिक्षकांना पगार झाल्याचे आणि तो बँकेत जमा झाल्याचे दोन मेसेज येतात. शिक्षक आणि त्यांचे वारस, अशा दोन पिढ्या बरबाद करण्याचे पाप अमरसिंह देशमुख यांनी केले आहे. माणगंगा बचाव समितीचे अध्यक्ष तानाजी लवटे यांनी कारखान्यातील गैरकारभारावर ताशेरे ओढले.
