शाळा ही ज्ञानाची मंदिर आहे. अनेक शाळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शाळेच्या सभोवती मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी नको असलेल्या वस्तू फेकल्या जातात आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढतच चालले आहे, त्यामुळे दुर्गंधीही पसरत आहे.
‘तिमिरातून तेजाकडे’ नेणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत अंधाराचा फायदा घेऊन अवैध कृत्य सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या अभावी शाळा ओस पडू लागल्या आहेत. सर्व शाळांच्याकडे महापालिका प्रशासन लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र याकडे महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे.
२० ते २५ वर्षांपूर्वी सुमारे ४६ हजार विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या महापालिकेच्या शाळेत आज जेमतेम सुमारे ७३०० विद्यार्थी आहेत. खाजगी शाळेमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण दिल्यामुळे पालकांचा हळूहळू ओढा खाजगी शाळांकडे वाढू लागला. त्यातून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली. पूर्वी नगरपालिका असताना सुमारे दहा ते पंधरा बस विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी होत्या. त्या गाड्यांची मुदत संपल्यानंतर आणि शासनाचा आदेश आल्यानंतर या सर्व बसेस बंद करण्यात आल्या. त्याचा परिणाम शाळांच्यावर झाला. लांबून येणारे विद्यार्थी जवळच्या खाजगी शाळेत जाऊ लागले. विद्यार्थी कमी झाल्यामुळे शाळा हळूहळू ओस पडू लागल्या. त्या शाळांच्याकडे पूर्वी नगरपालिकेचे आणि आता महानगरपालिकेचेही दुर्लक्ष झाले.
त्याचा फायदा काही गैरकृत्य करणाऱ्या व्यक्ती घेत आहेत. आता या ठिकाणी गांजा ओढणे, तीन पानी जुगार मांडणे, तळीरामांचा अड्डा असे अनेक अवैध कृत्य होताना दिसत आहेत. लाईट नसल्यामुळे त्याचा गैरफायदा काही लोक उचलत आहेत. शाळेच्या आवारामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्नही अनेक ठिकाणी झालेला आहे. महापालिका याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करताना दिसत आहे. आता या अवैध कृत्यांना आळा घालण्याची गरज आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीची नीट देखभाल केली नसल्यामुळे मोडकळीस आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
मात्र, याच इमारतीमधील काही खोल्या या खाजगी शाळांना भाडे तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्या खोल्यांची अवस्था उत्तम आहे. खाजगी संस्था खोल्या वेळोवेळी रंगवून घेऊन साफसफाई करून ठेवत आहेत. त्यामुळे त्या खोल्या आणि त्याच परिसरात महानगरपालिकेच्या ताब्यातील खोल्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वच्छतेचे तर नामोनिशानच या ठिकाणी राहिलेले नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्यावर होत आहे. एका बाजूला स्वच्छ सुंदर शाळा तर दुसऱ्या बाजूला दुर्गंधी आणि कचऱ्याने वेढलेली शाळा असे स्वरूप या शाळेचे झाले आहे. अशा शाळांच्याकडे महानगरपालिका कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे.