इचलकरंजी येथे मटका खेळणारे, घेणारे पोलिसांच्या जाळ्यात; सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त 

इचलकरंजी येथे कल्याण मटका खेळणाऱ्या आणि घेणाऱ्या ६ जणांना पोलिस उपअधिक्षकांच्या पथकाने अटक केली आहे. चंद्रकांत दवलू वास्कर (वय ४८), बाळासाहेब तातोबा वडर (वय ४२ दोघे रा. सहारानगर), नामदेव शंकर चौगुले ( वय ४२ रा. लक्ष्मीमळा), जितेंद्र दिनकर सुतार (वय ४३ रा. माळी गल्ली), इलाई रहेमानसाब यमकनमर्डी (वय ४५ रा. दत्तनगर) व बाळासाहेब भिमराव मनगुते (वय ५५ रा. दावतनगर) अशी त्यांची नांवे आहेत. या कारवाईत रोख रक्कमेसह ६ दुचाकी, ५ मोबाईल असा ३ लाख १४ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पो. ना. सुनिल मलगोंडा पाटील यांनी फिर्याद दिली आहे. 

कबनूर परिसरातील दावतनगर गल्ली नं. ४ मध्ये मुस्ताक पेंढारी यांच्या मालकीच्या खोलीत कल्याण नावाचा मटका घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी चंद्रकांत वास्कर हा मटका घेत असताना तर इतर पाचजण मटका लावण्यासाठी आले असताना मिळून आले. पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. या कारवाईत २ लाख ८० हजाराच्या ६ दुचाकी, २१ हजाराचे ५ मोबाईल आणि १३ हजार ६७० रुपयांची रोकड असा ३ लाख १४ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.