हातकणंगले येथे शेतकऱ्यांचा विरोध टाळून पोलीस बळाचा वापर करून रस्त्याची मोजणी

हातकणंगले येथे शेतकऱ्यांचा विरोध टाळून पोलीस बळाचा वापर करून रस्त्याची मोजणी करणाऱ्या राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या प्रशासनाची दडपशाही खपवून घेणार नाही. मोजणी केलेल्या खुणा रात्रीत बुजवून टाकणार आहे. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याने शेतकरी शांत बसले होते. मात्र रस्ते प्रशासन शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात डांबून ठेऊन मोजणी करत असल्याने कोल्हापूर दौऱ्यावर येणार असलेल्या मुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारू, असा खणखणीत इशारा माजी खास. राजू शेट्टी यांनी हातकणंगले येथे दिला आहे. 

राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने गुरुवारी हातकणंगले गावच्या हद्दीत शासकीय आयटीआयजवळ सकाळी मोजणीचे काम चालू केले याला शेतकऱ्यांनी विरोध केला. पोलिसांनी बळाचा वापर करून या सर्व शेतकऱ्यांना गाडीत घालून आणून पोलीस ठाण्यात डांबून ठेवले याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खास.राजू शेट्टी यांना समजताच ते कार्यकर्त्यांसह हातकणंगले पोलीस ठाण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांशी व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर माध्यमांसमोर बोलताना ते म्हणाले, रस्ते प्राधिकरणाने नागपूरपासून रत्नागिरीपर्यंतच्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला दिला आहे. मग चोकाक ते अंकली पर्यंतच्या शेतकऱ्यांनाच दुप्पट भरपाई का देत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा करून यावर निर्णय घेऊ, असे सांगितले होते, यामुळे शेतकरी शांत बसले होते.

प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात डांबून ठेऊन शासकीय आयटीआय ते रामलिंग फाट्यापर्यंत मोजणी करून घेतली, याला राजू शेट्टी यांनी विरोध केला असून प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून केलेल्या मोजणीच्या खुणा बुजवणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच या रस्त्यावर बांधल्या जाणाऱ्या भरावाच्या पुलामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसणार आहे याचे कोणतेही नियोजन शासनाकडे नसल्याचे म्हटले आहे. तसेच हातकणंगले-शिरोळ तालुक्याच्या सिमाभागावर मजले खिंडीत शेतकऱ्यांनी सायंकाळी रास्तारोको आंदोलन करत काही काळ वाहतूक बंद पाडली, यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.