आष्टा येथील आष्टा-नागाव रस्ता परिसरात झोपडपट्टीतील सुमारे १०० कुटुंबांना नागरी सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आष्टा अप्पर तहसील कार्यालयासमोर बेमुदत ‘उलटी खुर्ची’ आंदोलन सुरू करण्यात आले. प्रशासनाने तत्काळ कार्यवाही न केल्यास उद्यापासून ‘पाल ठोक’ आंदोलन छेडण्याचा इशारा वायदंडे यांनी यावेळी दिला. आष्ट्याचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते व महावितरणचे उपअभियंता अमित पाटणकर यांच्यासोबत दलित महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. मात्र, बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी वायदंडे म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरी सुविधांसाठी लढावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास उद्यापासून आंदोलन अधिक तीव्र करू.
यावेळी दलित महासंघाचे पोपटराव लोंढे, अशोकराव गायकवाड, सदाभाऊ चांदणे, संदीप गायकवाड, सुनील मोरे, संभाजी मस्के, नारायण वायदंडे, अमोल लोखंडे यांच्यासह आष्टा, नागाव रस्त्यावरील झोपडपट्टीतील नागरिक उपस्थित होते.
