खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील परिसरात वटवाघळे द्राक्ष घडाला गुंडाळलेल्या कागदाच्या आत शिरकाव करून चोचीने द्राक्षाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. या वटवाघळाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. अशी मागणी होत आहे. खानापूर तालुक्यात द्राक्ष उत्पादनासाठी व चांगल्या प्रतीचे द्राक्ष उत्पादन करण्यासाठी लेंगरे व परिसरातील शेतकरी रात्रंदिवस कष्ट घेत असतात.
परंतु शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला योग्य बाजारपेठ चांगला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकवलेला माल हा योग्य बाजारभाव नसल्यामुळे कमी किमतीत व्यापाऱ्यांना द्यावा लागतो द्राक्ष उत्पादनासाठी येणारा खर्च व मिळणारे वार्षिक उत्पन्न यात बराच फरक असल्यामुळे शेतकऱ्याला द्राक्ष शेती पिकवणे जिकरीचे झालेले आहे. तरीपण लेंगरे व परिसरातील सर्व द्राक्ष बागातदार यांनी आपल्या द्राक्ष पिकाला चांगला भाव मिळण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून चांगल्या प्रतीचे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करीत असतात. सद्यपरिस्थितीत द्राक्षाला थोडा चांगला भाव आहे परंतु निसर्ग नियमानुसार वटवाघळ हा प्राणी द्राक्ष पिकाचे नुकसान करत आहेत.
द्राक्ष पिकाला अतिशय महागडी औषधी वापरली जातात आता हातात तोंडाशी आलेला चांगल्या पद्धतीची निर्यातक्षम द्राक्षे डोळ्यांदेखत वटवाघूळ हा प्राणी द्राक्षाच्या नुकसान करीत आहे. या कामी महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, यांनी शेतकऱ्याला या वटवाघळापासून संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिसरातील सर्व शेतकरी याची शासनाकडे मागणी करत आहेत. लेंगरे येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदारांयांच्या बागेत या वटवाघळाचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे.
