आटपाडीत क्रीडा संकुलाबाबत बैठक; दिघंचीमध्ये सोयी-सुविधांनी परिपूर्ण क्रीडा संकुल उभे करू

आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील क्रीडा संकुल हे सर्व सोयी-सुविधांनी युक्त व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर आमदार सुहास बाबर यांनी हा प्रश्न हाती घेतला असून, आटपाडी येथे सुहास बाबर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा संकुलाबाबत बैठक झाली. या बैठकीत क्रीडा संकुल हे सुसज्ज, अद्ययावत व सर्व सोयी सुविधायुक्त उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, तहसीलदार सागर ढवळे, प्रांताधिकारी विक्रम बांदल, संदीप भंडारे, पोलिस निरीक्षक विनय बहिर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, तालुका क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, उपअभियंता संजय बालटे, रघुनाथ पाटील उपस्थित होते. बैठकीत क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात जागेची मोजणी, सपाटीकरण मंजूर असलेल्या तीन कोटींतून आराखडा करण्याच्या सूचना बाबर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रस्तावित क्रीडा संकुल हे संपूर्ण जिल्ह्यासाठी क्रीडा क्षेत्रात आदर्शवत ठरेल. तानाजीराव पाटील म्हणाले, तालुक्यात खेळाडू तयार होण्यासाठी स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करून या क्रीडा संकुलासाठी प्रयत्न करणार आहे.