आटपाडी तालुक्यात घरकूल बांधकामांना पाणीटंचाईचा तडाखा 

आटपाडी तालुक्यात घरकुलांच्या बांधकामांना गवंडी मिळत नसल्याने लाभार्थ्यांची पंचाईत झाली आहे. विविध घरकूल योजनांतून मंजुरी मिळालेल्या २३१२ पैकी १२७१ घरकुलांचे बांधकाम सुरू झाले आहे. उर्वरित घरकुलांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. प्रशासनाने मे अखेर घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र गवंडी आणि मजूरवर्ग मिळत नसल्याने मे अखेर गृहप्रवेश कसा होणार? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

पंचायत समितीच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक २ अंतर्गत तालुक्यामध्ये एकूण २३१२ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी १२७१ घरकुलांची कामे सध्या सुरू आहेत. अनेक मोठ्या गावांमध्ये ५० हून अधिक घरकुले मंजूर आहेत. पण तेथे गवंडीकाम करणाऱ्या कारागिरांचा तुटवडा जाणत आहे. यामुळे दोन महिन्यांत बांधकामे पूर्ण करण्याचे आव्हान लाभार्थी आणि प्रशासनापुढे आहे. बांधकामांसाठी पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी अनेक गावांत घरकुलांची फक्त पायाभरणी झाली आहे. काही ठिकाणी प्राथमिक कामे झाल्यानंतर बांधकामे थंडावली आहेत.