आटपाडी येथे ओढ्यात लागलेल्या आगीत पाणी योजनेचे नुकसान 

आटपाडी येथील तलावानजीक ओढापात्रातील गवत आणि झाडांना रविवारी दुपारी आग लागली. ओढ्यालगत गव्हाचे पीक निघाल्यानंतर राहिलेले तण जाळण्यात आले होते. त्याची ठिणगी ओढ्यात वाळलेल्या गवताला लागली. ओढ्याच्या पात्रातील सुमारे एक किलोमीटर अंतरातील गवत, शिसवाची झाडे, झुडपे, पुरवठ्याच्या पाणी पाईप आणि केबल आगीत जळाल्या. आटपाडी तलावाच्या भरावाच्या पायथ्याशी ओढा आहे. हा ओढा ग्रामदैवत अंबाबाई मंदिराजवळून वाहतो. तो तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या शुक ओढापात्राला मिळतो. या तलावाच्या भरावाच्या पायथ्याशी शेती आहे.

तलावाच्या पायथ्याशी शेतातील गव्हाचे तण जाळल्यावर त्याची ठिणगी ओढ्यातील गवताला लागली. ही आग ओढापात्रामध्ये पसरली. तीव्र उन्हाच्या तडाख्याने आणि जोरदार वाऱ्याने ही आग पसरली. मगर वस्तीनजीक वाहणाऱ्या ओढ्यातील एक ते दीड किलोमीटर परिसरात ही आग पसरली. वाळलेले गवत, लाकडे, झुडपे या आगीत जळून खाक झाली. नगरपंचायतीच्या जुन्या पाणी पुरवठा विहिरीलगतच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन आणि काही केबल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. ही आग सायंकाळी आटोक्यात आली.