नशा करण्यासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन विक्री करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे सतरा हजार पाचशे रुपये किमतीच्या ३५ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ओंकार धनराज पवार आणि बादल अब्दुल पिरजादे अशी या प्रकरणात अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. विटा शहरात जानेवारी महिन्यात सुमारे ३० कोटी रुपयांचे सापडलेले ड्रग्ज, लाखो रुपयांचा गांजा, नशेची इंजेक्शन आणि त्यानंतर पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला यामुळे विटा शहराची मोठी बदनामी झालेली आहे. आता पुन्हा एकदा शहरात नशेचा बाजार उघडकीस आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
विटा शहरातील काही युवक बॉडी बनवण्याच्या नादात नशेची इंजेक्शन घेत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानंतर सोमवारी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ संशयितरित्या उभा असलेल्या युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी त्याच्याकडे मेफेनटर्माईन सल्फेट या इंजेक्शनच्या ३५ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी याप्रकरणी ओंकार धनराज पवार यास तातडीने ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता सदरची नशेची इंजेक्शन त्याने बादल अब्दुल पिरजादे याच्याकडून घेतली असल्याचे सांगितल्यानंतर पिरजादे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
विशेष म्हणजे एमडी ड्रग्ज प्रकरणानंतर विटा शहरात नशेच्या विरोधात संतप्त वातावरण असताना या आरोपींनी कोणाच्या पाठबळावर नशेचा बाजार पुन्हा सुरू केला आहे ? सदरची नशेची इंजेक्शन कोणत्या मेडिकल मधून आणण्यात आली ? नशेच्या या बाजारात आणखी कोणाचा हात आहे का ? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.