आष्ट्यात मोपेडची बिबट्याला धडक

आष्टा- इस्लामपूर महामार्गावरील राज पेट्रोल पंपानजीक रस्ता क्रॉस करणाऱ्या बिबट्याला दुचाकीची धडक बसली. या धडकेत बिबट्यासह दुचाकीवरील कुपवाड येथील दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

आष्टा- इस्लामपूर महामार्गावर बिबट्या(leopard) दिसल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील वस्तीवरील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास आष्टा – इस्लामपूर महामार्गावर कुपवाड येथील दोघेजण इस्लामपूरहून सांगलीच्या दिशेने निघाले होते. ते आष्टा येथील शिंदे मळा राज पेट्रोल पंपा नजीक आले असता त्यांच्या मोपेडची महामार्गाच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक बसली. धडक इतकी जोराची होती की, गाडीवरील दोघेजण वेगवेगळ्या ठिकाणी फेकले गेले तर भारदस्त शरीरयष्टीचा बिबट्या(leopard) विवळत पडला. एरवी बिबट्याला प्रचंड घाबरणारे नागरिक मात्र यावेळी बिबट्याच्या समोरून मोटारसायकलवरून निघून गेले. यावरून बिबट्या गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. काही वेळानंतर बिबट्याने महामार्गाच्या डाव्या बाजूला ऊसाच्या शेतीत धूम ठोकली. काही नागरिकांनी हा क्षण त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला.

 
नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल करून जखमींना तात्काळ उपचारासाठी सांगलीकडे हलवले. शिंदे मळ्यातील सामाजिक कार्येकर्ते सागर जगताप, पोपट शिंदे, सुजीत शिंदे यांच्यासह नागरिकांनी परिसरातील ऊस शेतीत बिबट्याचा शोध घेतला मात्र बिबट्या मिळून आला नाही. पोलिसांनीही या परिसराचा पंचनामा केला. दुचाकी स्वार आणि बिबट्या या वास्तव धडकेची ही पहिलीच घटना कॅमेराबद्ध झाल्याने या अपघाताची चर्चा महाराष्ट्रभर पसरली आहे.