विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत शब्द फिरविल्याने शनिवार सरवडे येथील सभा उधळून लावण्याचा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलिस विभाग सतर्क होत शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. धरपकड सुरू असताना हातकणंगले पोलिस ठाण्याने माणगाव येथील शक्तिपीठ समर्थक प्रकाश पाटील यांची धरपकड केली.
दरम्यान, महामार्गाला विरोध करणारे व समर्थन करणारे एकाच गल्लीत राहत असल्याने समर्थक कार्यकर्त्याला पोलिसांनी पकडून नेले. शक्तिपीठ महामार्गात माणगाव हे गाव प्रमुख बाधित होणारे गाव आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांना रोखण्याकरिता येथील कार्यकर्ते जाणार असल्याचे पोलिसांना कळताच पोलिस आंदोलकांचे धरपकड सुरू केली. यामध्ये शक्तिपीठ समर्थक पाटील याला पकडताच मी शक्तिपीठ समर्थक आहे.
आंदोलनांशी माझा काही संबंध नाही, असे ते सांगून ही पोलिस ऐकण्याचा मनःस्थिती नव्हते. समर्थकांची धरपकड झाल्याची बातमी गावात समजताच समर्थक कपाळाला हात मारत सरपंचासह सदस्यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी हे शक्तिपीठ समर्थक आहेत, याची कागदपत्रे घेऊन या असा उपराट सल्ला देताच सदस्यासह कार्यकर्ते चाटच पडले. पकडलेला हा शक्तिपीठ समर्थकच आहे, अशी विनवणी सरपंचासह सदस्यांनी करताच पोलिसांनी त्याची सुटका केली.