वाळवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची चौकशी करा; राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निवेदन

वाळवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची चौकशी करण्याची मागणी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . यावेळी पक्षाचे आष्टा शहर अध्यक्ष शिवाजी चोरमुले, राजू माने व पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, वाळवा तालुक्यातील जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नेमणूकीच्या ठिकाणी राहत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना औषधोपचार तसेच आरोग्य सेवा वेळेवर मिळत नाहीत.

त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना चांगली वागणूक देखील मिळत नाही. त्यामुळे इलाज नसताना लोकांना हजारो रूपये खर्च करून खाजगी रुग्णालयकडे धाव घ्यावी लागत आहे. सावळज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे सर्पदंश झालेल्या महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला होता. गरोदर मातांना देखील वेळेवर औषधोपचार मिळत नाहीत. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित प्रशासन नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच पाठीशी घालते.

तरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांच्या तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित किंवा बडतर्फ करावे. अन्यथा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल.