प्रधानमंत्री पीक विमा योजनेत इचलकरंजीचा समावेश

इचलकरंजी (Ichalkaranji), माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आ. राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या इचलकरंजी महसुल मंडलमधील शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला आहे.

 राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत इचलकरंजी महसूल मंडलाचाही समावेश केला आहे. या निर्णयामुळे महापूरासह नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील अध्यादेश राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाकडून जारी करण्यात आला आहे. पीक विमा योजना अंतर्गत होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी मंडल स्तरावर नुकसानीचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार भरपाई दिली जाते. मंडल स्तरावर पीक विमा योजना राबविल्यामुळे पीक विमा संरक्षणाची व्याप्ती वाढते व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहचता येते. परंतु यामध्ये इचलकरंजी महसूल मंडलाचा समावेश नसले कारणाने महापूरात झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळत होती. तर मंडल नसल्यामुळे पीक वीमा भरुनही त्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागत होते. दरम्यान, इचलकरंजी महसूल मंडलाचा पीक विमा योजनेत समावेश करून प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविल्याबद्दल शहर व परिसरातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री प्रकाश आवाडे तसेच आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब कलागते, पै. अमृत भोसले, बाबासो रुग्गे, सागर कम्मे, राजू चव्हाण, राजू चनविरे, शिवाजी माळी, दादासो मगदूम, मौला मुजावर, जयपाल बेडक्याळे, महावीर बेडक्याळे, पिंटू कोळी, अरविंद निंबाळकर, चंद्रकांत बेडक्याळे, अजित चौगुले, महादेव मुडशिंगकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी,नागरिक उपस्थित होते.